घाटीतील डॉक्टरांनी वाचवली दोन चिमुकलींची दृष्टी...

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : खेळताना डोळ्यात लोखंडी तार घुसल्याने पाच वर्षांच्या दोन मुलींची दृष्टी जाण्याचा धोका होता. मात्र घाटीतील नेत्र विभागातील डॉक्टरांनी यशस्वी शस्रक्रिया करून दोन्ही चिमुकलींची दृष्टी वाचवली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे यांनी सांगितले.

पहिल्या घटनेत एक चिमुकली चिंचेच्या झाडाखाली खेळत असताना चिंच पडून त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात आणले असता तपासणीदरम्यान या मुलीच्या डोळ्यांत काडी अडकलेली असल्याचे निर्देशनास आले. आपत्कालीन शस्त्रक्रियेद्वारे ती काडी काळजीपूर्वक काढण्यात आली. दुसर्‍या घटनेतील लहान मुलगी घरासमोर खेळत असताना जमिनीवर पडलेली लोखंडी तार धक्का लागून थेट डोळ्यात घुसली. त्यामुळे या चिमुकलीच्या बुबुळाला गंभीर जखम झाली. तिलाही घाटी रुग्णालयातील नेत्र विभागात दाखल करण्यात आले. तिला तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली. या दोन्ही रुग्णावर अधिष्ठाला डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रविभागप्रमुख डॉ. अर्चना वरे, डॉ. तपन जक्कल, डॉ. वेणुकुमार रंगू यांच्या सहकायनि कार्निया तज्ज्ञ डॉ. महेश सोनपेठकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूलतज्ज्ञ टीममधील डॉ. गणेश निकम, डॉ. अमीर सय्यद, डॉ. नियती सेठी, डॉक्टर आकाश यांनी सहकार्य केले. तसेच स्टाफ नर्स कालंदी इधाटे, विकास गायकवाड, यमुना मुंडे, सोनाली गायकवाड, गीता गिते, रूपाली रासने यांनी शस्त्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.